Sunday, January 20

17 वर्षानंतर बनणार ‘चांदनी बार’ सिनेमाचा सिक्वेल

मागच्याच वर्षी ‘जुडवा-2’ रिलीज झाला. आता ‘दबंग-3’ आणि ‘किक-2’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहे. पण या सगळ्यात 2001 साली रिलीज झालेला ‘चांदनी बार’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या चर्चा आहे. मधुर भांडारकर हे त्यांच्या ‘चांदनी बार’ या सिनेमाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीत आहेत.
2001मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारचा मानकरी ठरला होता. आता मधुर भांडारकर ‘चांदनी बार-2’ रिलीज करण्याच्या तयारीला लागले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, 2005मध्ये डान्स बारवर लागलेल्या बंदीवर रिसर्च करून भांडारकर यांनी या सिनेमाचा सिक्वेल करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
या सिनेमाची कथा जवळजवळ तयार झाली असल्याची चर्चा आहे. आता लवकरच या सिनेमासाठी कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. ‘चांदनी बार-2’ या सिक्वेल सिनेमात कोणते चेहरे असणार याची सगळ्यांनाच आता उत्सुकता आहे.
चांदनी बार या सिनेमात अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत होती. तिच्यासोबत अतुल कुलकर्णी हे मुख्य भूमिकेत झळकताना दिसले. या सिनेमामुळे तब्बूला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. तर अतुलला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अनन्या खरेला पुरस्कार देण्यात आला होता. सामाजिक विषयांवर बनलेला हा सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
त्यामुळे आता या सिक्वेलमध्ये कोणत्या सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश पाडण्यात येणार, त्याचबरोबर कोणते चेहरे यात झळकणार याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे.