Saturday, July 21

३९ पत्नी आणि ९४ मुलं, जगातील सर्वात मोठं कुटुंब!

मिझोराम, जगभरात १५ मे हा दिवस जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. आपलं कुटुंब हे प्रत्येकासाठी खास असतं. तर या निमित्तानं आपण अशा कुटुंबाला भेटणार आहोत जे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं कुटुंब आहे. या कुटुंबात सध्या १८० सदस्य आहेत. मिझोरामध्ये हे कुटुंब राहतं.
मिझोराममध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील मुख्य सदस्याचे नाव आहे झियोना चाना. या कुटुंबाला अनेकांनी एका साबणाच्या जाहिरातीत आधीही पाहिलं असेल. त्यांना एकूण ३९ पत्नी, ९४ मुलं, १४ सूना आणि ३३ नातवंडं आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण हे खरं आहे. झियोना आपल्या ३९ पत्नींसोबत चार मजल्यांच्या एका मोठ्या घरात राहतात. या घराला १०० हून अधिक खोल्या आहेत.
आता तुम्ही म्हणाल इथे कुटुंबात इनमिन पाच माणसं जरी असली तरी आपल्याला गुण्यागोविंदाने राहता येत नाही, तिथे ३९ पत्नींसोबत झिओन कसे काय नांदत असतील? तिथे तर दर दिवसाला भांडणं होत असतील, असं आपल्याला वाटत असलं तरी हे साफ चुकीचे आहे. कारण हे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदतं. झिओन यांच्या पत्नींपैकी वयाने मोठी असलेली एक कुटुंबातील इतर महिलांमध्ये भांडणं तर होणार नाही ना, याची पुरेपूर काळजी घेते. तिच या प्रत्येकीला घरची कामं आणि जबाबदाऱ्या वाटून देते. झिओन यांनी कुटुंबासाठी काही नियम ठरवून दिलेत. घरातील प्रत्येक सदस्य या नियमांचे पालन करतात. म्हणून इतकी वर्षे हे कुटुंब एकत्र नांदते आहे.
झिओन आता ७१ वर्षांचे झालेत. ते अशा पंथातले आहेत जिथे पुरूषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आहे. त्यानुसारच त्यांनी ३९ लग्न केली आहेत. म्हणूच १८० सदस्य असलेलं हे कुटुंब भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं कुटुंब ठरलं आहे.