Saturday, February 23

२०१९ मध्ये नरेंद्र मोदींपासून दूर राहणार : बाबा रामदेव

नवी दिल्ली, योगगुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा आपण २०१९ मध्ये भाजपासाठी प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांपासून आपण दूरच राहणार असल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना गरज असल्याने तसंच ते संकटात असल्याने आपण त्यांना खुलं समर्थन दिलं होतं असं रामदेव बाबांनी सांगितलं आहे. मात्र आता त्यांना आपली गरज नसल्याने आपण अपक्ष आणि सर्वपक्षीय आहोत असंही ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘मी नेहमीच देशाला प्राधान्य दिलं असून तोच माझा सिद्धांत आहे. देश चांगल्या लोकांच्या हाती असावा हीच माझी राजकीय भूमिका आहे. मी स्वत:ला शिक्षण, आरोग्यासहित इतर मुद्द्यांसाठी समर्पित केलं आहे. यामुळेच मी स्वत:ला एक राजकीय व्यक्ती मानत नसून स्वतंत्र आहे. जो देशाची सेवा करत आहे’.
याआधीही रामदेव बाबा यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट करत राजकारणापासून दूर राहणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी रामदेव बाबा यांनी पंतप्रधानांवर टीका करणं लोकांचा मूळ अधिकार असल्याचं सांगितलं होतं. मात्र यावेळी पंतप्रधान देशासाठी कठोर मेहनत करत असल्याचं सांगत त्यांची बाजूही घेतली होती.
तसंच मोदी सरकारने महागाई कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं होतं. जर त्यांनी महागाई कमी केली नाही, तर त्यांना या आगीची झळ बसेल असा इशारा त्यांनी दिला होता. २०१९ च्या आधी इंधनाचे दर कमी करा असा सल्लाही मी मोदी सरकारला दिला असल्याचं त्यांना सांगितलं होतं.