Tuesday, December 18

१२ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल-अमीषा पटेल

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाचं कथानक प्रेम, देशभक्ती या महत्त्वाच्या निकषांवर आधारलेलं होतं. त्यामुळेच या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली होती. तसंच चित्रपटाच्या कथानकाबरोबरच अमिषा पटेल आणि सनी देओल यांनीदेखील उत्तम अभिनय करत चित्रपटाला न्याय दिला होता. त्यानंतर १२ वर्षांमध्ये दोघांनी एकही चित्रपट एकत्र केलेला नाही. पण आता हे दोघं लवकरच एका चित्रपटात एकत्र येणार असल्याचे ऐकण्यात येत आहे.
सनी देओलचा आगामी चित्रपट ‘यमला पगला दीवाना ३’ हा चित्रपट येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सनीला अन्य काही चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत.  मात्र त्यातील ‘भईया जी सुपरहिट’ या आगामी चित्रपटासाठी त्याने होकार दिला असून तो लवकरच या चित्रपटामध्ये झळकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री अमिषा पटेलदेखील स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे तब्बल १२ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, नीरज पाठक दिग्दर्शित ‘भईया जी सुपरहिट’ हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सनीने नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्ट ट्विटरवर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सनी देओलबरोबर प्रिती झिंटा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, अमीषा पटेल झळकत आहेत. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रिती झिंटादेखील २ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.