Saturday, February 23

हाफिज मला आवडतो, काश्मीरच्या जिहादला माझा पाठिंबा : मुशर्रफ

इस्लामाबाद, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी जाहीरपणे दहशतवादाचे समर्थन केले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी हाफिज सईद आणि त्याची संघटना लष्कर-ए-तय्यबाला पाठिंबा दिला. मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक आहे असे मुशर्रफ यांनी सांगितले.
लष्कर-ए-तय्यबावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने  भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. सईद काश्मीरमध्ये सक्रीय असून आपला त्याला पूर्ण पाठिंबा आहे असे मुशर्रफ म्हणाले. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या हाफीज सईदची मागच्या आठवडयात पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशावरुन नजरकैदेतून सुटका झाली.
दहशतवादी सईदचे समर्थन करणारे मुशर्रफ मात्र स्वत: फरार आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी कोर्टाने मुशर्रफ यांना फरार घोषित केले आहे.    मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक आहे. त्यांनाही मी आवडतो हे मला ठाऊक आहे असे मुशर्रफ म्हणाले. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या मदतीने हाफिजनेच लष्करची स्थापना केली आणि जमात उद दावा या संघटनेची राजकीय शाखा आहे.
सईद मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असून अमेरिकेने त्यांच्या डोक्यावर 1 कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचे आरोप सईदने स्वत:हून नाकारले आहेत त्यामुळे तो या हल्ल्यामध्ये सहभागी नव्हता असा दावा मुशर्रफ यांनी केला. लष्कर-ए-तय्यबावर 2002 पासून पाकिस्तानात बंदी आहे. स्वत: मुशर्रफ यांच्या प्रशासनानेच लष्करवर बंदी घातली होती.
मुशर्रफ यांना त्यांच्या या निर्णयाची आठवण करुन दिल्यानंतर ते म्हणाले कि, त्यावेळी सईदबद्दल आपल्याला जास्त माहिती नव्हती. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असती तर बंदी घातली नसती असे मुशर्रफ म्हणाले. त्यावेळी परिस्थिती वेगळी असल्यामुळे लष्करवर बंदी घालावी लागली. त्यावेळी आम्ही शांततेसाठी प्रयत्न करत होतो.
मुजाहिद्दीनची संख्या कमी करुन राजकीय चर्चा करावी असे आमचे मत होते आणि सईदबद्दलही जास्त माहितीही नव्हती अशी सारवासारव मुशर्रफ यांनी केली. काश्मीरमध्ये कृती करुन भारतीय लष्कराला दडपून टाकण्याच्या मताचा मी आहे. लष्कर-ए-तय्यबा त्यासाठी उपयुक्त होती पण अमेरिकेच्या मदतीने भारताने त्यांना दहशतवादी घोषित केले असे मुशर्रफ म्हणाले.