Sunday, January 20

हजार रुपयांसाठी पुत्राने केला मातेचा खून

रावेर, पाल (ता. रावेर)  येथील स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीचा पोटच्या मुलानेच एक हजार रुपयांसाठी मित्राच्या मदतीने निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना काल (ता. २३) उघडकीस घडली.
मृत महिलेचे नाव सुशीलाबाई भगवान भोई (वय ७०) असे आहे. या महिलेचे जावई चिंधू भोई (रा. पाडळसा, ता. यावल) भेटण्यासाठी आले असता त्यांना घराला कुलूप व कुजट वास येत असल्याने संशय आला. याबाबत पोलिसांना माहिती दिली. सपोनि जितेंद्र जैन व हवालदार संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रावेर येथील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि जैन यांनी तपास चक्रे फिरवली. दरम्यान पाल येथील घटनास्थळी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मृत महिलेस संतोष भगवान भोई हा एकुलता एक मुलगा व सहा मुली आहेत. आज दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी बी बारेला यांनी शवविच्छेदन केले. आज सायंकाळी सहा वाजता या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारासाठी मुलगा संतोष भोई  देखील उपस्थित होता. बहीण मंगलाबाईने त्यास तूच आईचा खून केला आहे असे विचारले असता त्याने कबुली दिली. दसऱ्याच्या दिवशी रात्री संतोष आणि त्याचा मित्र अकबर शेख साडेआठच्या सुमारास पाल येथे आले. संतोषने दारूसाठी आईकडे एक हजार रुपये मागितले. आईने न दिल्याने संतोषने अकबरला दरवाजात उभे राहण्यास सांगून घरातील लाकडी दांड्याने आईचा खून केला आणि तिच्यावर चादर टाकून निघून गेले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पाटील, हवालदार शिंदे, जैन, संदीप धनगर,योगेश खैरे, सुरेश मेढे, हर्शल पाटील जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश चौधरी, योगेश पाटील यांनी आरोपी अटक करण्यास मोलाची मदत केली.