Tuesday, December 18

सर्वोच्च न्यायालयाने नाकराली श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी

नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या स्वतंत्र चौकशीची मागणी फेटाळली आहे. चित्रपट निर्माता सुनिल सिंह यांनी ही याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली असल्याने सर्वांचं याकडे लक्ष लागलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. दुबईत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं होतं, ज्यानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. याचिका फेटाळताना तपासात आम्ही मध्यस्थी करु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सुनील सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. “आम्ही याप्रकरणी आधीच दोन याचिका फेटाळल्या आहेत. आम्ही मध्यस्थी करु शकत नाही”, असं सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केलं आहे.
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे २४ फेब्रुवारी रोजी बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्या ५४ वर्षांच्या होत्या. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे.