Sunday, January 20

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली, सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे. आता राम मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले असता, त्यांनी सुनावणी जानेवारी 2019मध्ये होणार असल्याचं म्हटलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सन 2010मध्ये या वादग्रस्त जागेची राम लल्ला, सुन्नी वक्फ मंडळ आणि निर्मोही आखाडा या तीन पक्षकारांमध्ये वाटणी करण्याचा निकाल दिला होता. अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या 2.77 एकर वादग्रस्त जागेवरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये गेल्या एक शतकाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. मध्यंतरी या अपिलांच्या सुनावणीत उपस्थित झालेला मुद्दा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावा का, असा प्रश्न निर्माण झाला होता. ‘मशिदीमध्येच नमाज पढणे हा इस्लामच्या धर्माचरणाचा अविभाज्य भाग नाही,’ असे मत न्यायालयाने सन 1994मधील इस्माईल फारुकी प्रकरणात नोंदविले होते. अयोध्या अपिलांच्या सुनावणीपूर्वी त्याचा घटनापीठाने फेरविचार करावा का, असा तो मुद्दा होता; परंतु 27 सप्टेंबर रोजी 2:1 अशा बहुमताने हा मुद्दा घटनापीठाकडे न पाठविण्याचे ठरले. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार आहे. त्यामुळे कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच याचा निकालही लागू शकतो.