Saturday, February 23

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!

पुणे, दि. १८ –  महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरमात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण मैदान मोकळं पडलं आणि मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली. कोणत्याही मुद्यावर मत व्यक्त करण्यात पुढे असलेल्या नेटीझन्सनी याच मुद्यावरून चांगलीच खिल्ली उडवली आहे. ट्विटर, फेसबूकसह व्हॉट्सअॅपवरही बरेच विनोद फिरत आहेत.
स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून सभा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी त्या ट्विटवरच खुमासदार सैलीत उत्तर देत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.
गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं. या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं. निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या अनेक सभांना गर्दी होत असताना, इकडे पुण्यात मात्र  हे चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री सभेसाठी आले, मात्र या सभेला अत्यंत तुरळक प्रतिसाद होता. दुपारच्या सभेसाठी मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही त्यांची सभा सुरु झाली नाही. गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री 15 मिनिटांपासून स्टेजवर गेले नाहीत. मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते. या सभेसाठी आणलेल्या असंख्य खुर्च्या तशाच रिकाम्या दिसत होत्या. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते.