Saturday, July 21

शेअर बाजाराला नवसंजीवनी; सेन्सेक्स ३३ हजारांवर

मुंबई, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने २.११ लाख कोटी रुपयांचे साहाय्य जाहीर केल्यानंतर याचे परिणाम बुधवारी शेअर बाजारावरही दिसले. बुधवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स वधारला आणि ३३ हजारचा पल्ला ओलांडला. तर निफ्टीनेही १०, ३२१.१५ वर झेप घेतली. निफ्टीने हा पल्ला गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दोन वर्षांकरिता २.११ लाख कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातील १.५५ लाख कोटी रुपये पुनर्भांडवली रोख्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित रकमेची तरतूद ही अर्थसंकल्पीय तरतूद आणि भांडवली बाजारातून निधी उभारणीतून येणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जपुरवठा क्षमता आता भक्कम होईल, असा दावा केला जात आहे.
केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर बुधवारी शेअर बाजारात बँकांचे शेअर्स वधारले. यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वाधिक फायदा झाला. एसबीआयचे शेअर्स २४ टक्के, पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स २१ टक्के आणि बँक ऑफ बडोद्याच्या शेअर्सचे भाव २० टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्स ३३, ११७. ३३ च्या पुढे गेला. तर निफ्टीने १० हजार पल्ला ओलांडून १०, ३४४ पर्यंत पोहोचला.
केंद्र सरकारने मंगळवारी पायाभूत क्षेत्राकरिता ऐतिहासिक आर्थिक तरतूद केली असून येत्या ५ वर्षांत ७ लाख कोटी खर्चून ८३, ६३३ किलोमीटरचे महामार्ग उभारले जाणार आहेत. या ऐतिहासिक तरतुदीत भारतमाला प्रकल्पाचाही समावेश आहे. यामुळेही शेअर बाजारात बुधवारी उत्साह दिसून आला.