Saturday, February 23

शिवसैनिक ठरवतील फडणवीस सरकारची डेडलाईन – आदित्य ठाकरे

मुंबई, महापालिका निवडणूक जशजशी जवळ येत चालली आहे त्यानुसार आरोपांची धार तीव्र होत चालली आहे. शिवसेना भाजपाचं तर सख्खा मित्र पक्का वैरी अशी काहीशी परिस्थिती झाली असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजपा शिवसेनेवर आरोप करत आहे, तर इकडे त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नवनवे आव्हान देत आहे. आरोप – प्रत्यारोपांची ही मालिका वाढत चालली असताना युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरिअडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली असून ‘फक्त मंत्रीपद मिळालं म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली आहे. नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का?’, असा टोला हाणला आहे. ‘निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही. जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर याचा विचार होईल’, असं सांगत आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरेंनी केला आहे.

याअगोदर आदित्य ठाकरे यांनी यांनी एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. ‘मी कधीच स्वत:ला निवडणुकांपासून दूर ठेवलेले नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे,’ असे आदित्य यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शविल्याने शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.