Tuesday, December 18

शावना पंड्या ठरणार अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला

टोरांटो – कॅनडामधील शावना पंड्या (वय 32) हिची सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमाअंतर्गत अवकाशमोहिमेमध्ये निवड झाली आहे. 2018 मध्ये ती अवकाशात उड्डाण करणार आहे.

शावना पंड्याची या अवकाशमोहिमेसाठी निवड झाल्याने कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणारी ती तिसरी भारतीय वंशाची महिला ठरणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज केलेल्या कॅनडामधील 3200 जणांमधून शावना आणि आणखी एकाची निवड झाली आहे. शावना ही कॅनडामधील अल्बर्टा येथे न्यूरोसर्जन आहे. ती मूळ मुंबईची असून आपल्या व्यवसायाव्यतिरिक्तही तिने अनेक आव्हानात्मक अभ्यास केले आहेत. ती तायक्वांदोमध्ये निष्णात असून फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन या भाषाही तिला अवगत आहेत. तिने आंतरराष्ट्रीय अवकाश विद्यापीठातून अवकाशशास्त्रात एमएस्सी केले आहे.

‘आपणा साऱ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद. मी नासामध्ये काही काळ काम केले आहे. माझा अवकाश औषधशास्त्रातील कोर्स झाला आहे. ही पार्श्‍वभूमी मला अवकाशात जाण्यासाठी उपयोगी ठरली’, अशा प्रतिक्रिया शावना पंड्याने व्यक्त केल्या आहेत.