Sunday, January 20

वेगवान धावपटू उसेन बोल्टला उत्तेजक चाचणीसाठी नोटीस

सिडनी, वेगवान धावपटू उसेन बोल्ट याला उत्तेजक चाचणीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. निवृत्त झाल्यानंतरही आणि फुटबॉलपटू म्हणून कुठलाही व्यावसायिक करार अजून केलेला नसताना आलेल्या या नोटिसीमुळे बोल्ट आश्‍चर्यचकित झाला आहे.
ट्रॅकवर जागतिक विक्रमांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा बोल्ट याने गेल्यावर्षीच ट्रॅकचा निरोप घेतला आहे. त्यानंतर त्याने फुटबॉलपटू म्हणून कारकीर्द घडविण्याचे निश्‍चित केले. मात्र, अजूनही त्याने कुठलाही व्यावसायिक करार केलेला नाही. सध्या तो ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून फुटबॉलपटूसाठी आवश्‍यक त्या चाचणी देत आहे.
या पार्श्‍वभूमीवर इन्स्टाग्रामवरून संवाद साधताना बोल्ट म्हणाला, “”धावपटू म्हणून निवृत्त झाल्यावर मी आता फुटबॉलपटू होण्याचा विचार करत आहे; पण ही नोटीस पाहा. ऑस्ट्रेलिया फुटबॉल महासंघाने मला स्पर्धा नसतानाच्या कालावधीत उत्तेजक चाचणी देण्यास सांगितले आहे. मी व्यावसायिक फुटबॉलपटू नसताना कशी काय चाचणी देण्यास जाऊ.”
बोल्टच्या प्रश्‍नाला त्याच्या वेगाइतकेच वेगवान उत्तर मिळाले आहे. “आपण नामांकित खेळाडू आहात. ऑस्ट्रेलियाच्या उत्तेजक प्रतिबंधविरोधी नियमानुसार उत्तेजक विरोधी धोरण अवलंबणाऱ्या खेळाचा तुम्ही भाग असाल, तर तुम्हाला ही चाचणी द्यावीच लागेल.’ असे उत्तर त्याला मिळाले. व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून शुक्रवारी झालेल्या चाचणी सामन्यात त्याने दोन गोल केले होते.