Sunday, January 20

विराट कोहलीला गंभीर दुखापत, इंग्लिश काऊंटीचं स्वप्न भंगण्याची शक्यता

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं काऊंटी खेळण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. आयपीएल-११ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शिकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली स्लिप डिस्कच्या समस्येने त्रस्त आहे. मेडिकल रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीला काऊंटी खेळण्याची संधी गमवावी लागणार आहे. यासोबत इंग्लंड दौऱ्यातूनही तो बाहेर पडण्याची शक्यता आहे.
गेल्या १२ महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत असलेल्या विराट कोहलीने स्लिप डिस्कसंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी खारमधील एका रुग्णालयला भेट दिली. तेथील तज्ञ डॉक्टरांनी विराटची तपासणी केली. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मेडिकल रिपोर्टमध्ये विराटच्या मणक्याला दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी विराटला क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला आहे. मात्र डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. रिपोर्टनुसार, विराटने डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर काऊंटी क्लब सरेला खेळणार नसल्याचं कळवलं आहे. मात्र अद्याप बीसीसीआय आणि विराटने यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
विराट कोहलीने अफगाणिस्तान कसोटी मालिकेत खेळण्याऐवजी काऊंटीला महत्व दिलं होतं, ज्यामुळे इंग्लंड दौऱ्यात फायदा होईल. २०१४ मधील इंग्लंड दौऱ्यात जेम्स एंडरसनच्या गोलंदाजवर विराटची चांगलीच दमछाक झाली होती. पाच कसोटी सामन्यांमध्ये विराटने १३.४ च्या सरासरीनुसार फक्त १३४ धावा केल्या होत्या.