Saturday, February 23

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा अंतिम संघ जाहीर, पृथ्वी शॉचा समावेश

मुंबई, विंडीजविरुद्ध गुरुवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा १२ खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIने सौराष्ट्र क्रिकेट च्या मैदानावर उसळती खेळपट्टी बनवण्याची मागणी केली होती. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती असेल तर तीन पैकी केवळ २ फिरकीपटूना संघात स्थान मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पृथ्वी शॉ ला संघात संधी मिळाल्यामुळे मयांक अग्रवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. तसेच मोहम्मद सिराजला देखील अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. संघात ३ वेगवान गोलंदाजांनाही स्थान देण्यात आले आहे.
पृथ्वी शॉच्या निवडीनंतर उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याने आनंद व्यक्त केला आहे. ‘पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी त्याला अगदी लहान असल्यापासून खेळताना पाहतो आहे. आम्ही नेटमध्ये एकत्र सराव केला आहे. तो आक्रमक सलामीवीर आहे. त्याची भारत अ संघातील कामगिरी अत्यंत उल्लेखनीय होती. त्याचेच फळ त्याला मिळाले आहे, अशा शब्दात रहाणेने त्याचे कौतुक केले.

१२ खेळाडूंचा संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर