Tuesday, December 18

लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास भारत हिंदू पाकिस्तान होईल : शशी थरुर

नवी दिल्ली, आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळविल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपकडून काँग्रेस अध्यक्ष ऱाहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे.
थरुर म्हणाले, की 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यास भारतात हिंदू पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल. या विजयानंतर भाजपकडून नवे संविधान लिहिले जाईल, यामध्ये भारताला पाकिस्तानसारखे बनण्याचा रस्ता मोकळा झालेला असेल. त्यावेळी भारतात अल्पसंख्यांकांचा त्यांच्या देशात कोणताही सन्मान केला जाणार नाही.
थरुर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. भाजप प्रवक्ते संबीत पात्रा म्हणाले, की काँग्रेस देश आणि हिंदू नागरिकांचा अपमान करण्याची एक संधी सोडत नाही. थरुर यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. हिंदू दहशतवादापासून हिंदू पाकिस्तानपर्यंत आता त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.