Sunday, January 20

राहुल गांधींसह काँग्रेस कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ -गडकरी

नागपूर, शहराचा विकास होत आहे. मोठे उद्योग येत असल्याने मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. काँग्रेसने गेल्या ४० वषार्ंत उद्योग नाही आणि रोजगार निर्माण करून दिले नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा राहुल गांधी जरी आमच्याकडे आले तरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दक्षिण पश्चिमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गडकरी यांची रामबागमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत ९ हजार ८७० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात मिहानमध्ये ५० हजार रोजगार मिळून दिला जाईल. गेल्या ४० वर्षांत उद्योग आणले नाही आणि रोजगार उपलब्ध करुन दिले नाही त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. भाजप सरकारने कौशल्य विकास प्रशिक्षणाची सोय करून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. आमची भूमिका ही प्रामाणिक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे लबाड नाही, असेही गडकरी म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुका दोन दिवसांवर आलेल्या असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३८ प्रभागामधील उमेदवारांचा क्लास घेऊन त्यांना सूचना केल्या. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करा आणि जे बंडखोर असतील किंवा पक्षात नाराज असतील अशा कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या, मतदानाच्या दिवशी प्रत्येक नगरसेवकांना आपआपल्या प्रभागाकडे लक्ष केंद्रीत करुन जास्तीत जास्त मतदारांना बाहेर कसे काढता येईल त्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे संघटन तयार करुन त्यांना सूचना द्या, भाजपची पारंपरिक मते आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा, असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि आमदार अनिल सोले यांनी उमेदवारांना सूचना दिल्या.