Tuesday, May 22

येडियुरप्पांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळूर, कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी बुधवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तासुंदरीची माळ भाजपच्याच गळ्यात पडल्याचे आज (गुरुवार) पहाटे स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता येडियपुरप्पा यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आल्यामुळे राजकीय घोडेबाजार तेजीत येणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज पहाटे याचिकेवर सुनावणी करताना येडियुरप्पा यांचा शपथविधीचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, त्यांना समर्थन असलेल्या आमदारांचे पत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. उद्या (शुक्रवार) पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
कर्नाटकमधील सत्तेच्या शर्यतीत अखेर भाजपने कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आघाडीवर कुरघोडी करत सत्तेची माळ स्वत:च्या गळ्यात पाडून घेतली. दिल्लीच्या आदेशानंतर राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
भाजप आमदारांच्या बैठकीत येडियुरप्पा यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर पुढील चित्र नेमके काय असेल हे स्पष्ट झाले होते. यानंतर येडियुरप्पांनी तातडीने राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेत त्यांना 104 आमदारांचे समर्थनपत्र सादर केले. दुसरीकडे धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांनीही प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यानंतर कुमारस्वामी यांनी राज्यपालांना “जेडीएस’सह कॉंग्रेसच्या 116 आमदारांचे समर्थनपत्र सादर केले. भाजपने आपल्या आमदारांना शंभर कोटी रुपयांची ऑफर देऊ केल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता पण, तो केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळून लावला. आपले समर्थक आमदार फुटू नयेत म्हणून कॉंग्रेसने त्यांना तातडीने वेगळ्या रिसॉर्टवर हलविले. नेमक्‍या त्याचवेळी कर्नाटक भाजपने ट्विट करून येडियुरप्पा गुरुवारी शपथ घेतील, असे जाहीर केल्याने एकच खळबळ निर्माण झाली. सगळ्याच चाली आपल्याविरोधात जात असल्याचे लक्षात येताच कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. पण अखेर व्हायचे तेच झाले भाजपने कॉंग्रेस- जेडीएसच्या तोंडून सत्तेचा घास हिरावून घेतला.