Tuesday, December 18

युवतीवर बलात्कार करून निर्घृण खून

सांगली, जत तालुक्‍यातील संख येथे प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला. संखपासून दीड किलोमीटर अंतरावरील वस्तीमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे.
अधिक माहिती अशी, संखपासून दीड किलोमीटर अंतरावर सदरचे कुटुंब वास्तव्यास आहे. युवती, तिचे वडील आणि तीन भाऊ असे चौघेजण राहत होते. युवतीच्या आईचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. काल (ता. 9) वडील बाजारात गेले होते.
भाऊ शेळ्या चरायला घेऊन गेला होता. दुपारनंतर युवती जवळच असलेल्या शेताकडे कपडे धुण्यासाठी गेली होती. त्याचवेळी संशयित आरोपीने शेतातच तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून खून केला. सायंकाळी उशिरा वडील बाजारातून घरी परतले. तेव्हा मुलगी घरी दिसली नाही. भाऊही तोपर्यंत आला. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. तेव्हा ऊसाच्या शेतात ती दिसली. अर्धनग्न अवस्थेत मृतावस्थेत पडली होती. तिच्यावर बलात्कार करताना गालाला चावा घेतल्याचे व्रणही दिसून आले.
खुनाच्या प्रकाराची माहिती उमदी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आज सकाळपासून तपासाची चक्रे गतीने फिरवली. प्राथमिक तपासात एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे. प्रेमप्रकरणातून त्याने खून केल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र तपास गोपनीय असल्यामुळे अधिक माहितीस पोलिसांनी नकार दिला. सायंकाळपर्यंत खुनाचा छडा लावला जाईल.