Sunday, January 20

‘या’ चित्रपटातून महेश बाबू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा ‘भारत अने नेनू’ हा तेलुगू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. महेश बाबूचा चाहतावर्ग पाहता एका मोठ्या बॉलिवूड कलाकाराप्रमाणेच त्याचा स्टारडम आहे. बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण करावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा असून ती लवकरच पूर्ण होण्याची चिन्हं दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू स्पेनमध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होता. ‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार तिथून हैदराबादला परतताना महेश बाबूने मुंबईत एका व्यक्तीची भेट घेतली. ही भेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासंदर्भातली असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरंतर महेश बाबूच्या बऱ्याच चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्यात आले पण बॉलिवूडमध्ये येण्याविषयी त्याने विचार केला नव्हता. त्याच्या ‘पोकिरी’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेक ‘वाँटेड’मध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारली. मात्र आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी महेश बाबू सज्ज असल्याचं दिसत आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी आधी सलमान किंवा हृतिक रोशनच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र, महेश बाबूने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर हा चित्रपट त्याला मिळण्याची शक्यता आहे.