Saturday, February 23

मोदी तर अंबानींचे पंतप्रधान आणि त्यांचेच चौकीदार : राहुल गांधी

नवी दिल्ली, राफेल करारात फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनंतर आता दसॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही अनिल अंबानी यांना भागीदारी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानींचे चौकीदार असून, त्यांचेच पंतप्रधान आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा राफेल करारावरून गंभीर आरोप केले आहेत.
नरेंद्र मोदी हे देशाचे नाहीतर अनिल अंबानींचे पंतप्रधान असल्याचा आरोप राहुल गांधीनी आज पत्रकार परिषदेदरम्यान केला. ते देशाची नाहीतर अंबानींची चौकीदारी करण्यात व्यस्त आहेत. रिलायन्स कंपनीला 30 हजार कोटी रुपयांची भागीदारी पंतप्रधान मोदी यांनी देत ते 30 हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात घातले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, मोदींनी लोकांचे पैसेच थेट अंबानींना दिला असल्याचा आरोप राहुलनी मोदी यांच्यावर केला.
देशाचे पंतप्रधान हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी राफेल करारात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. राफेल करारासंदर्भात नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत. त्यांनी या प्रकरणावर एवढे आरोप झाल्यावर उघडपणे बोलायला हवे आणि ते या मुद्यावर बोलत नसतील तर, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा. पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यायला हवे, पंतप्रधानांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सिद्ध करायला हवे.
तसेच, संरक्षणमंत्री फ्रान्सला जाण्याचे कारणही स्पष्ट करायला हवे. देशाच्या संरक्षणमंत्री फ्रान्सला जातात आणि कोणाला काहीच माहित नसते. हे सर्वांना कळायला हवे हा मुद्दाही राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.