Sunday, January 20

मोदींनी सीबीआयला राजकीय हत्यारासारखे वापरले : राहुल गांधी

नवी दिल्ली, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. सीबीआय म्हणजे सरकारकडून राजकीय सूड उगवण्यासाठी वापरले जाणार शस्त्र असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतले असणारे गुजरात केडरचे अधिकारी राकेश अस्थाना सीबीआयमधील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. आता त्यांच्यावर लाचखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या काळात सीबीआय म्हणजे राजकीय हत्यार झाले आहे. अगोदरच रसातळाला पोहोचलेल्या या संस्थेत आता अंतर्गत युद्ध सुरु झाल्याचे राहुल यांनी म्हटले.
राकेश अस्थाना हे १९८४ च्या गुजरात केडरचे अधिकारी आहेत. गोध्रा येथे २००२ साली साबरमती एक्स्प्रेस जाळण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. तेव्हापासून अस्थाना हे नरेंद्र मोदींच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात.
सीबीआयने राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.