Tuesday, December 18

मुस्लिमांच्या सशक्तीकरणात काँग्रेसला काडीचाही रस नाही : ओवेसी

नवी दिल्ली, AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या इफ्तार पार्टीत माजी राष्ट्रपती प्रणव यांच्या उपस्थितीवर कडाडून टीका केली आहे. मुस्लिमांच्या सशक्तीकरणात काँग्रेसला काहीही रस नाही हे अगदी लख्खपणे समोर आले आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्यांच्या संस्थापकांबाबत गौरवोद्गार काढले. अशा व्यक्तीला इफ्तार पार्टीसाठी राहुल गांधींच्या शेजारी बसवले जाते. काँग्रेस धोरण कसे मुस्लिम विरोधी आहे हेच यातून समोर आले आहे. फसवणूक करण्याचीही ही परिसीमा आहे अशीही टीका ओवेसी यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ग समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले होते. तिथे त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शनही केले. तसेच आरएससचे संस्थापक हेडगेवार हे भारतामातेचे सुपुत्र आहेत अशी प्रतिक्रियाही नोंदवली होती. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जींना इफ्तार पार्टीसाठी बोलावले होते. मात्र याच धोरणाविरोधात ओवेसींनी ट्विट केला आहे. काँग्रेसला मुस्लिमांच्या विकासात आणि सशक्तीकरणात काँग्रेसला अजिबातच रस नाही हे स्पष्ट होते आहे. काँग्रेसचे धोरण दुटप्पी आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासहीत १८ विरोधी पक्षांनाही निमंत्रण दिले होते. या इफ्तार पार्टीत माकपाचे महासचिव सीताराम येचुरी, तृणमूलचे दिनेश त्रिवेदी, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, एनसीपीचे डी.पी. त्रिपाठी या सगळ्यांचा सहभाग होता. मात्र याच इफ्तार पार्टीवर ओवेसींनी टीका केली आहे.