Sunday, January 20

मुंबईतील घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला औरंगाबादेत अटक

औरंगाबाद, मुंबई येथील घाटकोपर परिसरात 2002 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला जवाहर नगरातून अटक केली आहे. अब्दुल रहमान शेख (वय-43, रा .कैसर कॉलनी) असे आरोपीचे नाव असून तो फरार होता. काल (मंगळवार) सायंकाळी गुजरातच्या एटीएस पथकाने स्थानिक एटीएसच्या मदतीने अब्दुलला अटक केली.
मिळालेली माहिती अशी की, आरोपी अब्दुल रहमान शेख हा 2002 पासून सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. अब्दुलच्या पत्नीवर औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पत्नीला भेटण्यासाठी तो 5 ऑगस्टला भारतात आल्याची गोपनिय माहिती गुजरात एटीएस पथकाला मिळाली होती. पथकाने स्थानिक एटीएसच्या मदतीने अब्दुलच्या मुसक्या आवळल्या.
घाटकोपर येथे 2 डिसेंबर 2002 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बेस्टच्या डेपोतील एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. स्फोटात 32 नागरिक, महिला, मुले जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटामुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास 5 लाख 33 हजार 650 रुपयांचे नुकसान झाले होते.