Sunday, January 20

मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात होणार दाखल

पणजी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याहून एका विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी रुग्णालयात मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल घरी परतले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेणार आहेत.
बुधवारी (12 सप्टेंबर) मनोहर पर्रीकर मंत्रालयात हजर होणार होते. अमेरिकेहून परतल्यानंतर गेले आठ दिवस पर्रीकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य, घटकपक्षाचे नेते किंवा भाजपाच्या कोअर कमिटीलाही भेटण्याचे त्यांनी टाळले आहे.
भाजपाच्या कोअर कमिटीतही पर्रिकरांच्या अनारोग्यामुळे कमालीची अस्वस्थता आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून तातडीने नेतृत्वबदल करण्याची मागणी केली आहे. घटकपक्षांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड यांचा समावेश आहे. या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे आणि पक्षश्रेष्ठींचा दूत काय संदेश घेऊन येतोय, याकडे त्यांचंही लक्ष लागलंय.
दरम्यान, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांचाही एक गट भाजपा पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून आहे. 40 सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाचे 13, काँग्रेसचे 17, मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे तीन आणि उर्वरित अपक्ष सदस्य आहेत.