Saturday, February 23

भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे संकेत

नवी दिल्ली, सीमेवर दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. आपल्या जवानांनी सीमेवर सर्जिकल स्ट्राइक सारखं असं काही केलं आहे ज्याची माहिती तुम्हाला लवकरच कळेल, असे त्यांनी सुचकपणे म्हटले आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले. त्याचबरोबर आपल्या सैन्यासोबत क्रूरता सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राजनाथ म्हणाले, पाकिस्तानकडून नुकतेच आपल्या जवानांसोबत काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या जवानांनी सीमेवर काही केलं आहे, काही लोकांना याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत आपल्यालाही याची माहिती कळेल. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीए. त्यामुळे मी आपल्या बीएसएफच्या जवानांना सांगितले आहे की, शेजारचा देश आहे त्यामुळे पहिल्यांदा गोळी चालवू नका. जर तिकडून गोळी आली तर मात्र, आपल्या गोळ्या मोजत बसू नका.
पाकिस्तानने आपल्या बीएसएफच्या एका जवानासोबत कशी क्रूरता केली हे आपण पाहिलं आहे. कदाचित आपल्याला काही माहिती असेलही. मी आता याबाबत काही सांगणार नाही मात्र, काही तरी झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी काहीतरी ठीक-ठाक झाले आहे, असे लोकांशी बोलताना राजनाथ म्हणाले.
२८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ४ तळ उध्वस्त केले होते. भारताच्या या यशस्वी कारवाईची आठवण म्हणून काल आणि आज ‘पराक्रम पर्व’ नावाने सर्जिकल स्ट्राइक दिवस सरकारकडून साजरा केला जात आहे. यासाठी संरक्षण मंत्रालय, भारतीय सैन्य दलांकडून आणि विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.