Saturday, February 23

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सलग दहाव्यांदा नंबर १

मुंबई, ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने नुकतीच २०१७ सालच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबांनी यांनी India Rich List 2017 यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा ३८०० कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे अनेक उद्योगांना घरघर लागली असताना मुकेश यांची संपत्ती ६७ टक्क्यांनी वाढली आहे.
मुकेश अंबानी यांच्यापाठोपाठ ‘विप्रो’च्या अझीम प्रेमजी यांनी India Rich List 2017 यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांच्याकडे एकूण १९०० कोटी डॉलर्सची संपत्ती आहे. तर सन फार्माच्या दिलीप संघवी यांची दुसऱ्या स्थानावरून थेट नवव्या क्रमाकांवर घसरण झाली आहे. त्यांच्याकडे सध्या १२१० कोटी डॉलर्स इतकी संपत्ती असल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे. यावेळी ‘फोर्ब्स’ने केलेली टिप्पणी महत्त्वाची म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक प्रयोगांचा भारतीय अब्जाधीशांना विशेष फरक पडलेला दिसत नाही, असे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.
India Rich List 2017 यादीत मुकेश यांचे बंधू अनिल अंबानी ४५व्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडील संपत्तीचा आकडा ३१५ कोटी इतका नोंदवण्यात आलाय. तर मोदींच्या विशेष मर्जीतील म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यांनी १०व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्यावर्षी ते १३व्या स्थानावर होते. त्यांच्याकडे सध्या ११०० कोटी डॉलर्स इतकी संपत्ती असल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.