Sunday, January 20

प्रिती झिंटा सेहवागवर नाराज, वीरू किंग्ज इलेव्हन पंजाब सोडणार?

आयपीएलच्या मैदानात मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 15 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पंजाबची मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा चांगलीच नाराज झाली. इतकंच नाही तर या पराभवानंतर तिचा पंजाबचा मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागबरोबर वाद झाला. या सामन्यात के एल राहुलची वादळी खेळी वगळता, पंजाबचा दुसरा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही. या पराभावामुळे प्रितीने संघाच्या ‘रन’नीतीवरुन सेहवागशी हुज्जत घातल्याचं सांगण्यात येत आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रविचंद्रन अश्विनला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. करुण नायर, मनोज तिवारी असे सक्षम फलंदाज संघात असूनही अश्विनला बढती देण्यात आली. अश्विन अपयशी ठरल्यामुळे हा डाव उलटला त्यावरुन प्रितीने सेहवागला धारेवर धरले. संघाशी विनाकारण छेडछाड केल्यामुळे पराभव झाला असे प्रितीचे म्हणणे होते. त्यावर सेहवागने शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रिती झिंटाचे हे वर्तन सेहवागला अजिबात पटलेले नसून तो हा मोसम संपल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा देऊ शकतो. सेहवागने किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर पाच वर्षांचा करार केला आहे.
प्रिती झिंटा किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सहमालक आहे. नेस वाडिया आणि उद्योगपती मोहित बर्मन यांचा सुद्धा पंजाब संघात हिस्सा आहे. सेहवागने अन्य मालकांना प्रितीला समजावण्यास सांगितले आहे. सेहवागच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी तूर्तास सेहवागने या वादावर शांत राहण्याचे ठरवले आहे.