Saturday, February 23

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा, केंद्राकडे राहुल गांधींची मागणी

नवी दिल्ली, पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चटके बसत असलेल्या जनतेला काल केंद्र सरकारने अवघ्या अडीच रुपयांचा दिलासा दिला. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांनी कपात केली. तसेच राज्य सरकारांनीही व्हॅटमध्ये अडीच रुपयांची कपात करावी अशाही सूचना दिल्या. ज्यानंतर महाराष्ट्र सरकारने पेट्रोलच्या दरात अडीच रुपये कपात केली. तर गुजरात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपये कपात केली. ज्यामुळे पेट्रोलच्या दरांमध्ये पाच रुपयांची कपात महाराष्ट्रात झाली आहे. तर गुजरात मध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये पाच रुपयांची कपात करण्यात आली आहे.
हा दिलासा पुरेसा नाही कारण अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आवाक्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे दोन्हीचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी ट्विट द्वारे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याआधीही ही मागणी केली आहे. जीएसटीच्या कक्षेत हे दोन्ही आणल्यास दर कमी होतील मात्र केंद्र सरकारकडे इच्छाशक्ती नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी या दोन्हीचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत अशी मागणी केली आहे.