Sunday, January 20

नोरा फतेहीला सलमानची लॉटरी

अप्रतिम बेली डान्स आणि आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणं. सुष्मिता सेन आणि संजय कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘दिलबर’ या मूळ गाण्याचं हे रिक्रिएटेज व्हर्जन होतं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून अत्यंत कमी कालावधीत युट्यूबवर त्याला १० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रसिद्धीमुळेच नोराला आता थेट बॉलिवूडच्या ‘सुलतान’ची म्हणजेच सलमान खानची ऑफर मिळाली आहे. त्याच्या आगामी चित्रपटात नोरा झळकणार आहे.
‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार सलमानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटातील एका गाण्यात नोरा थिरकणार आहे. हे गाणं कोणतं असणार किंवा यामध्ये सलमानसुद्धा तिच्यासोबत थिरकणार का हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मोरक्कन- कॅनडियन अभिनेत्री नोरा ‘बाहुबली- द बिगनिंग’ या चित्रपटातील ‘मनोहरी’ या गाण्यातंही झळकली होती. मात्र ‘दिलबर’ गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं असं म्हणायला हरकत नाही.