Sunday, January 20

नोटाबंदी फक्त जनतेसाठी, पैसा मात्र भाजपकडे: राज ठाकरे

मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी नाशिकला दत्तक घेणार. पण ज्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतले ते नाशिकला काय दत्तक घेणार असा खोचक सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. नोटाबंदी फक्त जनतेसाठी असून पैसा मात्र भाजपकडे आहे. जाहिरातींवर भाजप कोट्यावधी रुपये खर्च करत असून हे पैसे आले कुठून असा सवालच त्यांनी भाजपला विचारला.
दादरमधील कबुतरखाना परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. दादरमधील सभेसाठी मैदान मिळावे यासाठी मनसेचे प्रयत्न सुरु होते. पण ते मैदान शिवसेनेने सभेसाठी घेऊन ठेवल्याने मनसेला मैदान मिळाले नव्हते. या घटनेचा दाखला देत राज ठाकरेंनी सभेतील भाषणाला सुरुवात केली. शिवसेनेने मैदानाच्या बाबतीत अडवणूक केली पण म्हणून आम्ही सभा घेणं थांबवतो का? मनसेची सभा म्हटल्यावर कुठेही गर्दी होणारच असे राज ठाकरे यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षात शिवसेना आणि भाजपने काय काम केले हे सांगितले नाही. अजूनही ते काय करणार हे सांगतात. सध्या ते फक्त भांडतात, एकमेकांची अब्रू काढतात, पण हे भांडण फक्त जनतेला दाखवण्यासाठी असल्याचा दावा ठाकरेंनी केला.