Sunday, January 20

देश-विदेशात क्रिकेटपटू घडवणार सचिन तेंडुलकरची क्रिकेट अकॅडमी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली क्रिकेट अकॅडमी काही ठराविक मर्यादेत अडकून न राहता पारंपारिक चौकटी ओलांडणार असल्याचं म्हटलं आहे. सचिन तेंडुलकर आणि मिडलसेक्स क्रिकेट नवोदित खेळाडूंसाठी क्रिकेट अकॅडमी सुरु करणार आहे. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी नऊ ते १४ वर्षीतील मुलांना प्रशिक्षण देणार आहे.
‘अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला मात्र त्यांना जे हवंय ते ऐकल्यानंतर मला खात्री पटली नाही’, असं तेंडुलकरने रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ‘पण जर आपल्याला तरुण क्रिकेटपटूंसाठी काही करायचं असेल तर आपले विचार जुळले पाहिजेत. दृष्टीकोनही महत्वाचा असून मिडलसेक्ससोबत हे सगळं योग्य जुळलं’, अशी माहिती तेंडुलकरने दिली आहे.
नॉर्थवूड येथील मर्चंट टेलर यांच्या शाळेत तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी आपला पहिला क्रिकेट कॅम्प आयोजित करणार आहे. ६ ते ९ ऑगस्टदरम्यान हा कॅम्प असणार आहे. मुंबईत नोव्हेंबरमध्ये कॅम्प पार पडेल.
‘हा कॅम्प भारत, इंग्लंड आणि देशातील इतर भागांमध्ये आयोजित केला जाईल. फक्त क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्येच कॅम्प होईल असं नाही’, असं तेंडुलकरने स्पष्ट केलंय. ‘अनेक देश आहेत ज्यांना क्रिकेटमध्ये रस आहे पण सुविधा उपलब्ध नाहीत. जास्तीत जास्त देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करणे मुख्य ध्येय असेल’, असंही तेंडुलकरने सांगितलंय.
अकॅडमीची विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या नावात क्रिकेट शब्द नाहीये. देशभरातील प्रशिक्षक आणि स्वत: तेंडुलकरने प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम आखून दिला आहे. ‘फक्त क्रिकेट अकॅडमी असणे हा उद्देश नसून आम्हाला क्रिकेटसोबत इतर खेळांनाही प्रचार करायचा आहे’, असं तेंडुलकरने म्हटलं आहे.
‘आम्हाला जगभरात क्लब सुरु करायचे आहेत. या क्लबमध्ये टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅश, टेबल टेनिस, स्विमिंग पूल असतील. आम्हाला खेळाचा प्रचार करायचा आहे. यामुळेच अकॅडमीच्या नावात क्रिकेट शब्द नाहीये. हेच आमचं मुख्य ध्येय आहे’, असं तेंडुलकरने सांगितलं आहे.