Saturday, February 23

दीपिका पादुकोणने साईन केला मेघना गुलजारचा चित्रपट

दीपिका पादुकोण सध्या ब्रेकवर आहे. यावर्षी जानेवारीत दीपिकाचा ‘पद्मावत’ रिलीज झाला होता. तेव्हापासून दीपिकाने कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. रणवीर सिंगसोबत लग्न करणार असल्याने दीपिकाने कुठलाही प्रोजेक्ट साईन केला नसल्याचे सांगितले गेले होते. पण आता दीपिकाचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पद्मावत’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर प्रत्येकजण दीपिकाच्या पुढील चित्रपटाची प्रतीक्षा करत होता. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, दीपिकाने दिग्दर्शिका मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे.या चित्रपटात दीपिका केवळ लीड रोल साकारणार नसून हा चित्रपट ती प्रोड्यूसही करतेय. म्हणजे, दीपिकाने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
मेघना गुलजार ‘राजी’, ‘तलवार’ अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या ‘राजी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. ‘राजी’नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय. यात दीपिकाची वर्णी लागली आहे. साहजिकचं या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिची ही व्यक्तिरेखा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्यापासून प्रेरित असेल.
दीपिका दीर्घकाळापासून अशा दमदार भूमिकेच्या शोधात होती ‘पद्मावत’नंतर दीपिकाने विशाल भारद्वाज यांचा ‘सपना दीदी’ साईन केल्याची खबर होती. यात तिच्या अपोझिट इरफान खान दिसणार होता. पण शूटींगच्या तोंडावर इरफानला कॅन्सर असल्याचे निदान झाले. यानंतर लगेच दीपिकालाही गंभीर पाठदुखीला सामोरे जावे लागले. तूर्तास ‘सपना दीदी’ हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला आहे. इरफान परतल्यानंतरच हा चित्रपट सुरू होणार आहे.