Thursday, November 15

दादर फूल मार्केटमध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या

मुंबई, मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये फुले व वजन काटा पुरवणाऱ्या मनोजकुमार मौर्या यांची (वय 35) अज्ञात मारेकऱ्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. पूर्ववैमानस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
दादर फूल मार्केट परिसरात मनोज मौर्या हा तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक वर्षांपासून काम करत होता. गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) रवींद्र शिसवे यांनी दुजोरा दिला अाहे.
पूर्वी फुलांची विक्री करणाऱ्या मनोजने कालांतराने इलेक्ट्रीक वजन काटा पुरवण्याचा ही व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे आज सकाळी बाजार फुले खरेदी करणाऱ्यांची गर्दी होती. नेहमी प्रमाणे मनोज ही सकाळी 5 वाजता सेनपती बापट मार्गावरील प्रमोद महाजन गार्डनजवळ आला होता. परळहून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळ्या झाडून दोघेही फरार झाले.
गोळीच्या आवाजांनी सर्वांचेच लक्ष वेधले गेले. त्यावेळी सर्वांनीच मनोजच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोजला व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी परळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्ही नोंदवून आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटिव्हीची मदत घेत अाहेत.