Saturday, February 23

डॉक्टरांनी सांगितले जयललितांच्या मृत्यूचे खरे कारण

चेन्नई, दि. 6 – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे आजारपण आणि त्यांच्या मृत्यूबाबत गेल्या दोन महिन्यांपासून अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांसमोर येत जयललितांच्या मृत्यूचे कारण जाहीर केले आहे.
जयललितांच्या रक्तात संसर्ग झाला होता. हा संसर्ग त्यांच्या अवयवांपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले. एकेक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे  जयललितांवर उपचार करणारे डॉक्टर रिचर्ड बेले यांनी सांगितले.
”जयललिता यांना तीव्र स्वरूपाचा मधुमेह होता. त्यामुळे त्यांच्या काही अवयवांनी काम करणे बंद केले होते. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्या बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हत्या. पण उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत फरक पडून त्या बोलू लागल्या होत्या,” अशी माहिती बेले यांनी दिली
तर जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातील अन्य एक डॉक्टर असलेले डॉ. बाबू म्हणाले, “जयललिता यांच्या प्रकृतीबाबत शशिकला आणि सरकारी अधिकाऱ्यांना रोज माहिती देण्यात येत होती.” जयललितांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियामध्ये अनेक अफवा पसरल्या होत्या. काही  त्यांच्या मृत्युमागे कटकारस्थान असल्याची शंका व्यक्त केली होती.