Sunday, January 20

टाटा टेलिसर्व्हिसेस बंद होणार; ५००० कर्मचाऱ्यांना नारळ

मुंबई, टाटा सन्सच्या मालकीची टाटा टेलिसर्व्हिसेस ही दूरसंचार कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासंबंधीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून टाटा टेलिसर्व्हिसेसकडून ५००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने या कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे. त्याआधी कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. तर मोजक्या कर्मचाऱ्यांना समूहातील इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाईल. गेली काही वर्षं टाटा टेलिसर्व्हिसेस सातत्याने तोटा सहन करतेय. या कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज आहे. त्यातच, या कंपनीतील आपली २६ टक्के भागीदारी ‘डोकोमो’ या जपानी कंपनीनं काढून घेतलीय. दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, स्वबळावर बाजारात टिकून राहणं “टाटा टेलिसर्व्हिसेस” साठी खूपच कठीण आहे. अशावेळी वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करताहेत. पण, फारशा सकारात्मक हालचाली दिसत नसल्यानं अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ‘पॅक-अप’चीच तयारी सुरू केली होती.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तोट्यात सुरू असलेल्या या कंपनीच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले होते. त्यामुळेच गेल्या महिन्यात कंपनीच्या विभागनिहाय प्रमुखांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आपला पदभार सोडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, टाटा समूह नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत आला आहे. परंतु, मोजक्या लोकांना समूहातील इतर कंपन्यांच्या सेवेत सामावून घेतले जाईल. आवश्यक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच इतर कंपन्यांमध्ये स्थान देण्यात येईल. यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांमध्ये सामावून घेणे योग्य ठरणार नाही, असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले. ३१ मार्च २०१७ रोजी सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये ५,१०१ कर्मचारी होते. मात्र, कंपनीने विभागनिहाय अधिकाऱ्यांना कंपनी बंद होणार असल्याचे कळवल्यानंतर या अधिकाऱ्यांकडून इतर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांनी टाटा टेलिसर्व्हिसेसमधील नोकरी आता सोडल्यास त्यांना ३१ मार्चपर्यंतचा पगार देण्यात येईल.