Saturday, February 23

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

जम्मू, जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
श्रीनगरमधील कारफल्ली मोहल्ला येथे दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले दोघेही नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
जम्मू- काश्मीरमध्ये पंचायत व पालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, अशी धमकी दहशतवादी संघटनांनी दिली होती. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांनी ही धमकी दिली होती. यापूर्वी गेल्या महिन्यात भाजपाच्या एका कार्यकर्त्याचीही दहशतवादी संघटनांनी हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे.