Sunday, January 20

गोव्यात समुद्रकिनारी प्रियकरासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार

पणजी, गोवा येथील समुद्र किनाऱ्यावर एका तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रियकरासमोरच नराधमांनी हे कृत्य केले असून नराधमांनी त्या युगूलाला विवस्त्र करुन मारहाण केल्याचे सांगितले जाते.
दक्षिण गोवा येथील एका समुद्र किनाऱ्यावर प्रेमी युगूल संध्याकाळी गप्पा मारत बसले होते. यादरम्यान तीन तरुण तिथे पोहोचले. त्या तिघांनी त्या युगूलाला हटकले. यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तिघांनी त्या युगूलाला मारहाण केली, तसेच त्यांना विवस्त्र करुन त्यांचे छायाचित्र देखील काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीचा प्रियकरही तिथेच होता. नराधमांनी त्याला बेदम मारहाण केल्याने तो काहीच करु शकला नाही, असे समजते.
दक्षिण गोवामधील पोलीस अधीक्षक अरविंद गवस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी झाली आहे. नराधमांचा शोध सुरु असून संशयितांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.