Saturday, February 23

गॅरी कर्स्टन आयपीएलच्या बंगळुरू टीमचा नवा प्रशिक्षक

बंगळुरू, आयपीएलमध्ये बंगळुरूच्या टीमनं गॅरी कर्स्टन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. याआधी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरीकडे ही जबाबदारी होती. मागच्या ८ वर्षांपासून व्हिटोरी बंगळुरूच्या टीमचा आधी खेळाडू आणि मग प्रशिक्षक होता. भारतानं २०११ साली वर्ल्ड कप जिंकला तेव्हा गॅरी कर्स्टनच भारतीय टीमचा प्रशिक्षक होता. कर्स्टन मागच्या मोसमात बंगळुरूचा बॅटिंग प्रशिक्षकही होता.
मागच्या मोसमात व्हिटोरीसोबत बंगळुरूच्या टीमचं प्रशिक्षण करताना मजा आली होती. बंगळुरुच्या टीमसोबत नवीन प्रवासासाठी मी तयार आहे. या कामासाठी मला लायक समजल्यामुळे मी टीमचे आभार मानतो, असं कर्स्टन म्हणाला.
आठ वर्ष बंगळुरूसोबत घालवल्यानंतर मी टीमचा आभारी आहे. पहिले खेळाडू आणि मग प्रशिक्षक म्हणून मी टीमसोबत होतो. मी फ्रॅन्चायजीला शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया व्हिटोरीनं दिली आहे.
बंगळुरूची फ्रॅन्चायजीनं कर्णधार विराट कोहलीच्या शिफारसींवरून प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची गच्छंती केल्याचं बोललं जातंय.
आयपीएलच्या इतिहासामध्ये बंगळुरूची टीम ही नेहमीच तगडी म्हणून ओळखली जाते. पण मागच्या ११ मोसमांमध्ये एकदाही बंगळुरूला आयपीएल जिंकता आलं नाही. विराटच्या टीमनं २०१८ साली १४ पैकी फक्त ६ मॅच जिंकल्या होत्या. विराट आणि एबी डिव्हिलियर्ससारखे खेळाडू असूनही बंगळुरूची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर होती.