Saturday, February 23

गुजरातमध्ये तरुणांवर हल्ले होत असताना मोदी शब्दही उच्चारत नाहीत : राहुल गांधी

नवी दिल्ली, गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराची घटना समोर आल्यापासून येथे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर अनेकजण गुजरात सोडून आपल्या राज्यात पळून जात आहेत. दरम्यान याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. गुजरातमध्ये तरुणांवर हल्ले होत असताना मोदी शब्दही उच्चारत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.
‘गुजरातमधील तरुणांना मारहाण करत तुम्ही राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचे असल्याचं सांगत हाकललं जात आहे. मात्र नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करत व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस आल्याचं राहुल म्हटलं होतं. ‘गरिबी हीच सर्वात मोठी भीती . बंद पडलेले कारखाने आणि त्यामुळे गेलेला रोजगार हेच गुजरातमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचं मूळ आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची स्थिती गंभीर आहे. कष्टकऱ्यांना लक्ष्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी याच्या विरोधात आहे,’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.