Sunday, January 20

खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय : राहुल गांधी

खेडा, गुजरातमधील खेडामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला. खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले, “विकासाचं कोणतंही काम इतरांचं ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष कोणतंही काम करण्याआधी लोकांशी चर्चा करतं. मात्र गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये कामगार, महिला, लहान दुकानदार यांना जे बोलायचं आहे, ते कुणीही ऐकत नाही.”
जीएसटीवरुनही राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. “जीएसटीची कल्पना काँग्रेस पक्षाची होती. संपूर्ण देशात एकच कर प्रणाली असावी, असं आम्हाला वाटत होतं. आम्ही लोकांपर्यंत आलो. लोकांना विचारलं, त्यानंतर लोकांनी सांगितलं, देशात एकच कर प्रणाली असावी. शिवाय, 18 टक्क्यांपेक्षा जास्त कर न लावण्याचेही लोकांनी सूचवलं. आमच्या जीएसटीच्या कल्पनेत या गोष्टी होत्या. शिवाय, जीएसटी भरण्यासाठी एकच फॉर्म होता. आमचं जीएसटी असं होतं.”
“नरेंद्र मोदींनी कुणाचंही न ऐकता रात्री 12 वाजता जीएसटी लागू केलं. आम्ही सांगितलं की, 18 टक्क्यांहून अधिक कर लावू नका, कारण अशामुळे लहान-सहान व्यापाऱ्यांना फटका बसेल. भाजपने ना लोकांचं ऐकलं, ना आमचं ऐकलं. अचानकपणे जीएसटी लागू केलं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.”, असे राहुल गांधी म्हणाले.
“नरेंद्र मोदींनी नोटाबंदी लागू केली, तेव्हाही कुणालाच विचारलं नाही. कुणा लहान शेतकऱ्याकडे जाऊन त्याला विचारलं असतं की, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने काय होईल? तर शेतकऱ्यांनीच सांगितलं असतं की, चुकूनही नोटा बंद करु नका. कारण नोटाबंदीने लाखो लोकांना तोटा सहन करावा लागला आहे.”, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, “देशात बेरोजगार लोकांची मोठी फौज बनत चालली आहे. प्रत्येक 24 तासाला 30 हजार तरुण रोजगार शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. 30 हजारमधील केवळ 450 तरुणांना मोदी सरकार 24 तासात रोजगार देत आहे. आपली स्पर्धा चीनशी आहे. चीनमध्ये एका दिवसात 50 हजार तरुणांना रोजगार मिळतो.”