Sunday, January 20

कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार

मुंबई, दि. 18 – शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही. हे मी लिखित मध्ये लिहून द्यायला तयार आहे. पण तसेच शिवसेनेनेही पाठिंबा काढणार हे लिहून द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शनिवारी  पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.

“मी कोणालाही समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच शिवसेनेनेही लेखी स्वरुपात द्यावं, असं आव्हान  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलं आहे. शिवसेनेने मुंबई आणि अऩ्य महापालिका निवडणुकीसाठी भाजपा बरोबरची युती तोडली आहे. दोन्ही पक्ष दररोज परस्परांवर टोकाची टीका करत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा बरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे विधान केले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारी म्हणजे आजच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत. त्याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “मी आताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लेखी स्वरुपात आम्ही (राष्ट्रवादी) समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच त्याची कॉपी राज्यपालांनाही देण्यास तयार आहे. पण शिवसेनेनेही असंच पत्र तयार करुन आमचं समर्थन नाही, हे लिहून राज्यपालांना द्यावं आणि त्याची कॉपी सर्क्युलेट करावं.”