Sunday, January 20

केरळमध्ये पावसाचा कहर, भूस्खलन आणि पुरामुळे 20 जणांचा मृत्यू

तिरुवनंतपूरम, मुसळधार पावसाने केरळला झोडपून काढले असून, संततधार पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इडुक्की येथील अडीमाली शहरातील एकाच कुटुंबामधील पाच सदस्यांचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील इडुक्की धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे धरणाचे काही दरवाजे खोलून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या 26 वर्षांमध्ये इडुक्की धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी सकाळी इडुक्की धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी 169.95 मीटरवर पोहोचली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, “आम्ही लष्कर, नौदल आणि एनडीआरएफकडून मदत मागितली आहे. सध्या बचावकार्यासाठी एनडीआरएफची तीन पथके दाख झाली आहेत. तसेच दोन पथके लवकरच दाखल होती. तसेच अजून सहा पथकांना पाचारण करण्यात येणार आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नेहरू ट्रॉफी बोट रेस स्पर्धासुद्धा रद्द करण्यात आली आहे.”
मुसळधार पावसामुळे पेरियार नदीला पूर आल्याने कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ जलमग्न झाला आहे. त्यामुळे विमानतळावरील विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पावसामुळे कांजिकोडे आणि वालियारदरम्यान रेल्वे मार्गावरील माती वाहून गेली आहे.