Saturday, February 23

‘कुराण वाचताना मजा येत नाही’, सलमान रश्‍दी यांचं वक्तव्य, पुन्हा एकदा इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर

मुंबई, वादग्रस्त पुस्तक ‘द सॅटनिक व्हर्सेस’चे लेखक सलमान रश्दी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणवर केलेल्या वक्तव्यामुळे सलमान रश्दी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कुराण वाचताना सुख किंवा आनंद होत असल्याचा अनुभव येत नाही असं सलमान रश्दी बोलले आहेत. ब्रिटनमधील चेलटेनहम लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, ‘मी कुराण वाचू शकत नाही. कारण मला ते मजेशीर वाटत नाही’.
‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकानंतर इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर राहिलेले सलमान रुश्दी पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेत आले असून, पुन्हा एकदा त्यांच्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे. इस्लामिक कट्टरपंथींना अजून एक मुद्दा मिळाला असून ते पुन्हा एकदा निशाणा साधण्याची शक्यता आहे. ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकानंतर मुस्लिम समाजातील अनेकांनी संताप व्यक्त केला होता. इतकंच नाही तर त्यांच्या हत्येसाठी फतवाही जारी झाला होता. यामध्ये इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्लाह खुमैनी यांचा फतवा चर्चेत राहिला. त्यांनी सलमान रश्दी यांची हत्या करणा-याला लाखो डॉलर्स बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केली होती.
‘द सॅटनिक व्हर्सेस या कादंबरीवर भारतानं मुस्लिम कट्टरपंथीयांच्या दबावाला बळी पडून 1988 मध्ये बंदी घातली होती. तेव्हा खुद्द रश्‍दी यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली होती. रश्‍दी यांनी त्या पत्रात म्हटलं होतं की, ‘हे पुस्तक इस्लामवर टीका-टिपणी करणारं नाही, ही बाब आपण सा-यांनीच लक्षात घ्यायला हवी. हे पुस्तक आहे स्थलांतर, आपली दुभंगलेली व्यक्‍तिमत्त्वं, प्रेम, मृत्यू आणि लंडन व मुंबई ही दोन महानगरं… यांच्याविषयीचं.’ पण रश्‍दी यांचा हा प्रतिवाद मान्य झाला नाही आणि या पुस्तकावर सरकारनं घातलेली बंदी सुरूच राहिली.
ब्रिटनमधील वृत्तपत्र डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात जुन्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सामील झालेल्या सलमान रश्दी यांनी यावेळी सांगितलं की, ‘कुराण वाचणं आनंददायी नाही, कारण यामधील जास्तीत जास्त भाग कथेच्या स्वरुपात नाहीये’. सलमान रश्दी यांच्या म्हणण्यानुसार, ‘कुराणमध्ये फार कमी जागा कथेला देण्यात आली आहे. कुराणचा एक तृतीयांश भाग इस्लामवर विश्वास न ठेवणा-यांवर आहे. ज्यामध्ये इस्लामवर विश्वास न ठेवल्यास कशाप्रकारे नरकात जावं लागेल हे सांगण्यात आलं आहे. दुसरा एक तृतीयांश भागात कायद्याची माहिती आहे. म्हणजे तुम्ही कशाप्रकारे एखाद्याशी वागलं पाहिजे वैगेरे’.
‘धर्माविना जगायचं ठरलं तर हे जग एक उत्तम ठिकाण सिद्द होईल. धर्म बकवास आहे, कारण तो लोकांची हत्या करायला लावतो’, असंही सलमान रश्दी बोलले आहेत.