Tuesday, December 18

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचं अपहरण

श्रीनगर, जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) सैन्याच्या एका जवानाचं अपहरण केलं. औरंगजेब असं अपहृत जवानाचं नावं असून ते पुंछ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. राज्याच्या पोलिसांसह सगळ्यांनीच जवानाच्या शोधासाठी या परिसरात मोठ्या स्तरावर सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य आहेत.
औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवलं आणि त्यांचं अपहरण केलं.
दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मृतांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर समीर टायगरचा समावेश होता.
समीर टायगर 2016 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. समीर पुलवामाचा रहिवासी होता. तसंच हिजबुलच्या अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. बुरहान वाणीनंतर समीरला काश्मीरच्या पोस्टर बॉयच्या रुपात सादर करण्यात आलं होतं. समीरने दहशतवादी वसीमच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गोळीबारही केला होता.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने रमजानच्या पार्श्वभूमीवर सीजफायरची घोषणा केली आहे. म्हणजेच दहशतवाद्यांविरोधात कारवाई बंद आहे. परंतु सीजफायरदरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिलं आहे. आजच सैन्याने बांदीपोरा जिल्ह्यामधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यामध्ये एक जवानही शहीद झाला आहे.