Sunday, January 20

काळ्या जादूने पत्नी वारली; बापाने तीन मुलांना क्रूरपणे संपवले, अकोल्यातील थरारक घटना

अकोला, धोतर्डी येथे बापाने तिन्ही मुलांना क्रूरपणे संपवल्याचे थरारक रहस्य गुरुवारी समोर आले. मुलगी शिवाणीच्या उशाखाली पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. माझा परिवार फार सुंदर होता, पण काळ्या जादूने माझी पत्नी वारली; आता आमचा चौघांचा नंबर होता, असे या मनोविकृत बापाने त्यात लिहिले आहे.
विष्णू दशरथ इंगळे(वय ४५ ) या मनोविकृताने मुलगा अजय, मनाेज व मुलगी शिवानी या पोटच्या मुलांचा निर्घृण खून केला. मुलांना संपवायचे व स्वत:ही मरायचे त्याने निश्चित केले होते. बुधवारी दुपारपासूनच त्याने तशी तयारी केली होती. त्याने एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीच्या झेरॉक्स कॉपीही काढून आणल्या. त्यानंतर त्याने मुलांसाठी खाऊ आणला. त्यात विष कालवले. मात्र त्यामुळे मुलांचा जीव न गेल्याने त्याने त्यांना शॉक दिला व डोक्यात वरवंटा घालून ठार केले. त्यानंतर स्वत: त्याने विळ्याने मारून घेतले व विष प्राशन केले.
इतके निर्दयी कृत्य बापाने कसे केले. याचा उलगडा घरात सापडलेल्या चिठ्ठीवरून झाला. पोलिस कॉन्स्टेबल गणेश निमकर्डे यांनी घराची झडती घेतली असता त्यांना ज्या ठिकाणी मुलगी शिवानीचा मृतदेह होता. तिच्या डोक्याखाली एक चिठ्ठी दिसून आली. त्या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे की, ‘सर्व गावकऱ्यांना माझा शेवटचा जयभीम! माझा परिवार फार सुंदर होता. पण काळ्या जादूचा असर पडताबरोबर माझा परिवार बरबाद झाला. वर्षभराआधी माझी पत्नी वारली, आता आमचा चौघांचा नंबर होता. माझ्या परिवाराचा असा शाप लागेल की …किडे पडतीन..माझ्या पत्नीच्या अंगात मुंज्या होता. तिला मी देवीवर नेले. शेवटी ती वारली, आता माझ्या मुलीचा आणि मुलांचा नंबर होता.’ अशा अंधश्रद्धेने आरोपी पिता विष्णूने अघोरी पाऊल उचलले व त्यातच त्याने मुलांना मारून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. आरोपी पित्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.