Sunday, January 20

काँग्रेस ‘आयसीयू’त, महाआघाडी ‘व्हेंटिलेटर’वर : पंतप्रधान

नवी दिल्ली, मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताबाहेर पळून जाण्यासाठी मोदी सरकारने मदत केल्याचे आरोप सध्या होत आहेत. त्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ”महाआघाडी सध्या व्हेंटिलेटरवर असून, काँग्रेस आज आयसीयूमध्ये आहे. काँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी विविध राजकीय पक्षांच्या ‘सपोर्ट सिस्टिम’ची गरज आहे”, अशा शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांसह नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, ”आज महाआघाडीतील पक्षांमध्ये एकी नाही. त्यांनी आपली कमतरता लपविण्यासाठी काही लोकांशी आघाडी केली आहे. जेव्हा कोणी आयसीयूत असते तेव्हा त्याला वाचविण्यासाठी ‘सपोर्ट सिस्टिम’ची गरज भासते. त्यामुळे आता काँग्रेसलाही अशाप्रकारे सपोर्ट सिस्टिमची गरज आहे. काँग्रेस आज काही राजकीय पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मध्यप्रदेशमध्ये महाअधिवेशनात काँग्रेसकडून सांगण्यात आले, की कोणासोबतही तडतोड करणार नाही. मात्र, आता काँग्रेसला याची गरज का पडत आहे”, असा सवालही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थित केला.
महाआघाडीवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ”काँग्रेसकडून राजकीय पक्षांना जोडण्याचे काम केले जात आहे. मात्र, आम्ही देशातील सव्वा कोटी जनतेला जोडण्याचे काम करत आहोत. या महाआघाडीतील हेतू अस्पष्ट आहे. नेतृत्वात संशय आहे आणि त्यांचे वागणूक भ्रष्ट आहे”.
दरम्यान, ”ते नामदार आहेत आणि आम्ही कामदार आहोत. त्यांचा हेतू फक्त एका कुटुंबाचे कल्याण करणे हे आहे. मात्र, आमचे लक्ष्य राष्ट्राची निर्मिती करणे हे आहे”, अशा शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.