Saturday, February 23

करिश्मा कपूरची डिजिटल माध्यमात एन्ट्री

डिजिटल माध्यमांकडे कलाकारांचा ओढ वाढला असून याची तरूणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळते आहे. इतकेच नाही तर बॉलिवूड व मराठी इंडस्ट्रीतील कलाकार देखील वेबसीरिजकडे वळत आहेत. करण जोहर, अनुराग कश्यप, इम्तियाज अली असे दिग्गज दिग्दर्शक आणि सैफ अली खान, राधिका आपटे, कियारा अडवाणी, विकी कौशल, नवाजुद्दीन सिद्दीकी अशा बऱ्याच कलाकारांनीदेखील डिजिटल माध्यमात काम केलेले आहे.या यादीत आता आणखीन एका नावाचा समावेश होणार आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर. ती वेबसीरिजमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी करिश्माला विचारण्यात आले असता आपण आईच्या भूमिकेतच सध्या आनंदी असल्याचे तिने सांगितले होते. पण तिने अभिनय करणे कधीच सोडले नाही. छोट्या मोठ्या जाहिरातीमधूनदेखील ती काम करताना दिसते. मात्र चित्रपटाची चांगली स्क्रिप्ट न मिळाल्यास, काम करणार नसल्याचेही तिने सांगितले होते. पण आता कदाचित तिला चांगली स्क्रिप्ट मिळाली असून एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीबरोबर करिश्माने हातमिळवणी केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या प्रोजेक्टसाठी तिच्या तारखा फायनल करण्यात आल्या असून करिश्माला कथादेखील आवडली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही.
करिश्मा कपूरचा २०१२ मध्ये ‘डेंजरस इश्क’ नावाचा चित्रपट आला होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. तिचा हा कमबॅक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. मात्र करिष्मा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सक्रीय असते. ती सतत आपले फोटो पोस्ट करत असते. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायला तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.