Sunday, January 20

उद्योगपती अनंत बजाज यांचे निधन

मुंबई, बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अनंत बजाज यांचे काल (शुक्रवार) सायंकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथे निधन झाले. त्यांच्यामागे आई किरण, पत्नी, मुलगा आणि बहीण असा परिवार आहे. अनंत बजाज यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे.
अनंत बजाज हे बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र तर प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे होत. त्यांच्याकडे बजाज इलेक्ट्रिकल्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार होता. वयाच्या 41 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अनंत बजाज यांचा जन्म 18 मे 1977 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. याशिवाय 2013 मध्ये हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये ओनर प्रेसिडेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर 1999 मध्ये बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून त्यांच्या करिअरला सुरवात केली.
दरम्यान, अनंत बजाज यांच्या निधनाचे वृत समजताच उद्योगविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 41  वर्षीय बजाज यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.