Saturday, February 23

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने रोहित शर्माची निवड न करून चूक केली : दिलीप वेंगसरकर

मुंबई, भारत आणि इंग्लंड कसोटीः इंग्लंड दौऱ्यात भारताचे सलामीचे फलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. चौथ्या कसोटीतही सलामीच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. त्यामुळे पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईकर रोहित शर्माला संघात संधी मिळायला हवी होती, असे परखड मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.  रोहितची निवड न करण्याची मोठी चूक निवड समितीने केल्याचे मत वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
तिसऱ्या कसोटीनंतर सलामीवीर मुरली विजयला डच्चू दिल्यानंतर रोहितची निवड निश्चित मानली जात होती, परंतु निवड समितीने मुंबईचाच युवा फलंदाज पृथ्वी शॉ याची निवड केली. मात्र त्याला चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार कोहलीने चौथ्या कसोटीत पुन्हा एकादा राहुल व धवन यांच्यावर विश्वास दाखवला. या दोघांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. त्यांनी दोन डावांत अनुक्रमे 37 व 4 धावांची भागीदारी केली. भारताचे माजी निवड समिती प्रमुख वेंगसरकर यांनी रोहितला न निवडण्याची चूक महागात पडली असे सांगितले.
”कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी रोहितची निवड न करण्याचा निर्णय चुकीचा होता. सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयशी ठरल्याने रोहितला संघात स्थान मिळत नसावा, असे माझा समज होता. पण, इंग्लंड वातावरणात खेळण्यासाठी लागणारी तंत्रशुद्ध शैली रोहितकडे आहे आणि त्याला संधी मिळायला हवी होती,” असे वेंगसरकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.